सातारा : जागतिक सहकार वर्षाचे औचित्य साधून ग्रीन वर्ल्ड आणि कॉसमॉस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सहकार मंथन’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाची दखल घेत रेठरे बुद्रुक येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याला ‘ग्रीन वर्ल्ड को प्राईड’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे आयोजित सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक निवासराव थोरात, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, विलास भंडारे, सी. एन. देशपांडे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, वैभव जाखले यांनी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला.
याबाबत कारखान्याच्यावतीने माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, सातारा जिल्ह्यात ऊसाला कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी दिलेला उच्चांकी दर, प्रशासनातील पारदर्शकता, कारखान्याचे आर्थिक नियोजन, खर्चात बचत, योग्यवेळी साखर निर्यात, जयवंत आदर्श योजनेचे यश, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर, फिल्ड स्टाफ आपल्या दारी, गाळपातील तत्परता, इथेनॉल व आसवनी प्रकल्प, को-जन पूर्ण क्षमतेने सुरू, बायो कंपोस्ट व पर्यावरण बाबींची पूर्तता याचा अभ्यास करून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्कार वितरण कार्यक्रमाला मान्यवर उपस्थित होते.

















