कोल्हापूर : श्री दत्त कारखान्यास पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने दिला जाणारा कै. आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्कारामुळे कारखान्याच्या नावलौकिकात भर पडली असून कारखान्यास मिळालेला हा ६९ वा पुरस्कार आहे. मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी दिली. दत्त कारखान्याच्या या क्षेत्रातील आतापर्यंतच्या कामगिरीची दखल घेऊन ‘व्हीएसआय’च्यावतीने कारखान्यास हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सोमवारी (ता. २९) होणाऱ्या ‘व्हीएसआय’च्या वार्षिक साधारण सभेत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
याबाबत माहिती देताना गणपतराव पाटील म्हणाले की, दत्त कारखान्याने प्रदूषण नियंत्रणासाठी आधुनिक व अद्ययावत यंत्रणा, पाण्याचा काटकसरीने वापर केला आहे. तसेच पाण्याचा पुनर्वापर, सांडपाण्याचा वापर व त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात होणारी बचत, सांडपाणीशून्य उत्सर्जनाची योग्य अंमलबजावणी, वृक्षलागवड, माती संवर्धनासाठी प्रयत्न केले आहेत. यासोबतच कारखाना कार्यक्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर जोपासलेला हरित पट्टा, परिसरात पर्यावरण संवर्धनासाठी केलेली कामे व पर्यावरण व्यवस्थापनासाठी कुशल मनुष्यबळ आदींची दखल घेऊन पुरस्कारासाठी कारखान्याची निवड करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक, सर्व संचालक, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील पाटील व खातेप्रमुख उपस्थित होते.

















