पुणे : जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील व्यंकटेश कृपा शुगर मिल्स लि. मध्ये राज्य सरकार व पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हा वैधमापनशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने अचानक भेट देऊन कारखान्याची काटा तपासणी केली. उसाने भरलेली व रिकामी वाहने वजनकाट्यावर घेऊन प्रत्यक्ष वजन करून पडताळणी करण्यात आली. तपासणीत वापरण्यात येणारे सर्व वजनकाटे प्रमाणित, सीलबंद व अचूक असल्याचे स्पष्ट झाले. कोणत्याही प्रकारची तफावत किंवा अनियमितता आढळून आली नाही. तपासणी वेळी उपनियंत्रक आर. ई. गवंडी व निरीक्षक आर. एस. परदेशी यांनी अचूकतेचा अहवाल कारखाना प्रशासनास दिला, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन संदीप तौर यांनी दिली.
चेअरमन संदीप तौर म्हणाले की, हा कारखान्याचा १५ वा ऊस गाळप हंगाम आहे. सध्या कारखान्याने सुमारे २.७० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप यशस्वीरीत्या केले आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात शिरूर, हवेली, दौंड व खेड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी ऊसपुरवठा करीत आहेत. कारखान्याने प्रथम ऊस बिल हफ्ता रु. ३,१०० प्रतिटन दराने अदा केले असून, उर्वरित रक्कम दिवाळीपर्यंत कमीत कमी रु. १०० प्रतिटन दराने दिली जाणार आहे. कारखाना शेतकऱ्यांना पाडेगाव येथून उसाची रोपे व बियाणे शेतकऱ्यांना पुरवत आहे. तसेच व्हीएसआयकडून ऊस संवर्धनासाठी लागणारी संजीवके, सप्रेरके व किटकनाशके यांचा पुरवठाही कारखाना करत आहे. कारखाना डिस्टिलरीमध्ये स्पेटवॉशपासून तयार होणारे पोटॅश पावडर खत नाममात्र दरात साइटवर उपलब्ध आहे, ज्याचा लाभ परिसरातील शेतकरी घेत आहेत. तपासणीवेळी व्यंकटेश कृपा शुगर मिल्स लि.चे जनरल मॅनेजर के. एस. दोरगे, असि. जनरल मॅनेजर व्ही. य. सोनवणे, मुख्य अभियंता टी. एन. निघुते, केन मॅनेजर पी. बी. वामन आदींसह ऊसतोडणी वाहतूक कंत्राटदार आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

















