छत्रपती संभाजीनगर : चालू हंगामात ऊसतोडणीसाठी हार्वेस्टर मशीनचा वापर वाढल्यामुळे पैठण तालुक्यातील साखर कारखान्याचा गळीत हंगाम लवकरच संपण्याची शक्यता आहे. तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना, रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना विहामांडवा चौढाळा, गुळमेश्वर गुळ पावडर कारखाना नवगाव, शिवाजी गूळ पावडर कारखाना नांदर आदींचा हंगाम सुरु आहे.
ऊस तोडीसाठी मोठ्या प्रमाणावर हार्वेस्टर मशीन यंत्राचा वापर करण्याचा पर्याय कारखाना व्यवस्थापनाने निवडला आहे. बीड, धुळे, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील काही ऊसतोड मजूर वाहतूकदार दरवर्षीच्या गळीत हंगामासाठी ऊसतोडीसाठी येतात, मात्र ही संख्या आता कमी झाली आहे. चालू वर्षीच्या गळीत हंगामात हार्वेस्टरच्या वाढत्या संख्येमुळे भरमसाठ ऊस तुटून जात आहे. मागील वर्षीच्या गळीत हंगामाच्या तुलनेतून यंदाच्या ऊस गळीत हंगामात ऊस तोडणीसाठी हार्वेस्टर मशीनची संख्या प्रत्येक कारखानदाराने वाढवली आहे.
पैठण येथील नाथसागर धरणामुळे दोन वर्षांपासून शेती सिंचनासाठी पाण्याची परिस्थिती चांगली आहे. शेतकऱ्यांनी इतर पिकांच्या मागे न लागता ऊस लागवड करण्यासाठी प्राधान्य दिले. पैठण तालुक्यातील ऊस साखर कारखान्यांनी इतर जिल्ह्यांच्या तुलनेतून ऊस उत्पादकांना समाधानकारक ऊस दरवाढ जाहीर केली नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. यामुळे तालुक्यातील काही ऊस उत्पादकांनी गेल्या वर्षाप्रमाणे चांगला ऊस दर देणाऱ्या बाहेर जिल्ह्यांतील कारखान्यांशी करार करून तालुक्यातील ऊस इतर ठिकाणी देण्यासाठी पसंती दिली.

















