नांदेड : कुंटूरकर शुगर ॲण्ड ॲग्रो प्रा. लि. या साखर कारखान्याला गळीत हंगाम २०२४-२५ कामगिरीबद्दल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) तर्फे उत्तर-पूर्व विभागातून द्वितीय क्रमांकाचा ‘तांत्रिक कार्यक्षमता’ पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती कारखान्याचे मुख्य लेखा अधिकारी आनंद जाजू यांनी दिली. राज्यातील साखर कारखान्यांना मार्गदर्शन करणारी आणि साखर उद्योगात अग्रेसर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (मांजरी बु.) दरवर्षी गळीत हंगामात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकारी व खाजगी कारखान्यांना पुरस्कार प्रदान करते.
कुंटूरकर शुगर ॲण्ड ॲग्रो प्रा. लि. या कारखान्याने सर्व तांत्रिक निकष पाळल्यामुळे उत्तर-पूर्व विभागात ‘तांत्रिक कार्यक्षमता’ द्वितीय क्रमांक मिळविला आहे. हा पुरस्कार माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) चे अध्यक्ष खासदार शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव वळसे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या २९ डिसेंबर रोजी पुणे येथे प्रदान केला जाणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी व वाहतूक ठेकेदार आदींनी कारखान्याचे चेअरमन राजेश देशमुख कुंटूरकर यांचे अभिनंदन केले आहे.

















