अहिल्यानगर : साखर उद्योगातील शिखर संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या वतीने दिल्या जाणारा तांत्रिक कार्यक्षमतेचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार यंदा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला. मध्य महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांमधून ही निवड करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे यांनी दिली.
बोरनारे म्हणाले, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेच्या वतीने चांगली कामगिरी करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना दरवर्षी सन्मानित करण्यात येते. काळे कारखान्याच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जातो. उच्च कार्यक्षमतेचे निकष यशस्वीरीत्या पूर्ण केले जातात. याची दखल घेऊनच हा पुरस्कार जाहीर झाला. मागील वर्षी या कारखान्यास मध्य महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार मिळाला होता. यंदा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला, कारण कारखान्याने तांत्रिक क्षमतेत आघाडी घेतली घेतली आहे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे दोन टप्यात विस्तारीकरण पूर्ण केले. गाळप आणि तांत्रिक क्षमतेते कारखाना अव्वल स्थानावर गेला आहे. गाळप करताना साखरेचा कमीत कमी अपव्यय, बगॅस बचत, स्टीमचा कमीत कमी वापर, साखरेचा दर्जा याबाबतीत कारखान्याने आघाडी घेतली. त्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखाना अध्यक्ष, आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

















