सांगली : पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने दिला जाणारा उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेसाठीचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला. कारखान्याने गळीत हंगाम २०२४ मधील रिड्युसड मिल एक्स्ट्रशन, २५ गाळप क्षमता वापर, बगॅसची बचत, साखर उतारा, गाळप क्षमतेतील वाढ या सर्व तांत्रिक निकषांची पूर्तता केली. त्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने कारखान्यास या पुरस्कारासाठी पात्र ठरविले आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी दिली.
अध्यक्ष नायकवडी म्हणाले की, क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा यांनी वाळवासारख्या ग्रामीण भागात सहकारी तत्त्वावर १९८१ मध्ये शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचा उदात्त हेतू विचारात घेत कारखान्याची स्थापना केली. त्यांच्या आदर्श पायवाटेवरच वाटचाल सुरू आहे. कारखान्याने आतापर्यंत उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता, उच्चांकी साखर उतारा व ऊसदराची परंपरा कायम राखली आहे. सोमवारी, दि. २९ रोजी व्हीएसआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुरस्कार वितरण होईल. उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर, संचालक गौरव नायकवडी, अरविंद कदम, बापूसाहेब पाटील, तानाजी निकम, विश्वास थोरात, तुकाराम डवंग, रामचंद्र पाटील, गंगाराम सूर्यवंशी, संचालक विशाखा कदम, जयश्री अहिर, वैशाली मोहिते, कार्यकारी संचालक शिवाजी पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

















