कोल्हापूर : पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यामार्फत दिला जाणारा मानाचा ‘ऊस भूषण पुरस्कार’ येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद करनूर (ता. कागल) येथील प्रगतिशील शेतकरी अमोल कुमार खोत यांना जाहीर झाला आहे. खोत यांनी शाहू साखर कारखान्याकडे गळितास आलेल्या को-८६०३२ या ऊस जातीचे हेक्टरी २८१.६३ टन इतके विक्रमी उत्पादन घेतले आहे. दक्षिण विभागातील पूर्व हंगाम लागण गटात २०२४-२५ गळीत हंगामामध्ये सर्वाधिक ऊस उत्पादन घेतल्याबद्दल त्यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. शेती अधिकारी दिलीप जाधव व शेती विभागाचे मार्गदर्शन त्यांना मिळाले.
२०२४-२५ या वर्षातील विविध पुरस्कारांची घोषणा व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कडू-पाटील यांनी बुधवारी (ता. २४) केली. सोमवारी (ता. २९) मांजरी (पुणे) येथे होणाऱ्या व्हीएसआयच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुरस्कारांचे वितरण होणार आहे. अमोल खोत यांच्यासह शाहू साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सुजय पाटील यांना राजारामबापू पाटील कारखान्याकडील २०२४-२५ या सेवा कालावधीसाठी ‘उत्कृष्ट ऊस विकास अधिकारी’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या यशाबद्दल शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे, उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील, संचालक व कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांचे प्रोत्साहन लाभले. व्हीएसआयच्या पुरस्काराबद्दल खोत यांनी आनंद व्यक्त केला.

















