छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांना सहकारी साखर कारखान्यांकडून अन्यायकारक वागणूक मिळत आहे. अनेक वेळा कारखाना व प्रशासनासोबत पत्रव्यवहार व आंदोलन करून देखील कारवाई झालेली नाही. तालुक्यातील कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावे व ऊस बिले १५ दिवसांच्या मुदतीत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावीत, अन्यथा २ जानेवारी रोजी तिन्ही कारखान्यांची ऊस तोड वाहतूक व गव्हाणी बंद आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. यासंदर्भात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे.
या तिन्ही साखर कारखान्यांनी येत्या सात दिवसाच्या आत ऊस दर जाहीर करावे. ऊस घेतल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत बिले अदा करावीत. मुदतीत बिले न दिल्यास पंधरा टक्के व्याजासह ऊस बिल देण्याचे आदेश द्यावे अशी मागणी स्वभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखाना लि. चोंढाळा, शिवाजी ॲग्रो लि. नांदर, ता. पैठण, संत एकनाथ सहकारी साखर कारखाना लि. पैठण या कारखान्यांविरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. तिन्ही कारखान्यांनी मागण्यांविषयी सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पाटील-मुळे पैठण तालुकाध्यक्ष संतोष पाटील तांबे आदींनी दिला आहे.

















