छत्रपती संभाजीनगर : दहिगाव (जि. अहिल्यानगर) येथील कृषी विज्ञान केंद्रा (केव्हीके) चे विषयतज्ज्ञ डॉ. नारायण निंबे यांनी ‘सुधारित ऊस लागवड तंत्रज्ञान’ या विषयावर शेतकऱ्यांशी संवाद साधला. ऊस उत्पादन वाढीसाठी पारंपरिक तीन डोळा लागवड पद्धतीऐवजी एक डोळा लागवड पद्धतीचा करण्याचा सल्ला त्यांनी दिला. सध्या अनेक शेतकरी कोकोपीट व ट्रे पद्धतीने रोपे तयार करतात. मात्र, त्याऐवजी कमी खर्चाची, सोपी व परिणामकारक सुपर केन नर्सरी पद्धत अवलंबण्याची शिफारस त्यांनी केली. एमजीएमच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे नुकताच हा ७८ वा शेतकरी शास्त्रज्ञ कृषी संवाद उपक्रम पार पडला.
गांधेली कृषी विज्ञान केंद्रातर्फे शेतकरी शास्त्रज्ञ कृषी संवाद उपक्रमांतर्गत डिसेंबर महिन्यात विविध चर्चासत्रे घेण्यात आली. यामध्ये मृदा आरोग्य विषयावर डॉ. हरिहर कौसडीकर, कीड व रोग नियंत्रण यावर प्रा. तुषार चव्हाण, तसेच मोसंबी व आंबिया बहार व्यवस्थापन विषयावर डॉ. एस. आर. पाटील यांनी मार्गदर्शन केले. विस्तार शिक्षण संचालक पी. आर. देशमुख यांनी या उपक्रमासाठी मार्गदर्शन केले. यावेळी निंबे यांनी एकात्मिक खत व्यवस्थापन, योग्य बेणे निवड, ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा वापर यावर भर देण्याचे आवाहन केले. सुपर केन नर्सरीसाठी सपाट गादीवाफे तयार करून त्यावर रिकाम्या खताच्या गोण्या पसरवाव्यात. त्यावर शेणखत, पोयटा माती व गांडूळ खत यांचे एकास एक प्रमाणातील मिश्रण तीन इंच जाडीने टाकावे. बेणे निर्मितीसाठी ९ ते ११ महिने वयाचा ऊस निवडावा असा सल्ला त्यांनी दिला.

















