नागपूर : केंद्र सरकार पर्यायी इंधन आणि बायो-फ्यूल वापरण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन देत आहे. येत्या काळात कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटसाठी वित्तपुरवठा घेताना जर कोणी अल्टरनेटिव्ह फ्यूल किंवा बायो-फ्यूलवर आधारित पर्याय निवडला, तर त्यांना ५ टक्के अनुदान (सब्सिडी) दिली जाईल. यामागचा उद्देश या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर वाढवणे हा आहे. नागरिकांनी डिझेल आणि पेट्रोलवरचे अवलंबित्व कमी करावे, नाहीतर युरो-6 चे कडक इमिशन नॉर्म्स लागू करू, असा इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. भारताचे भविष्य पर्यायी इंधन आणि बायो-फ्यूलशी जोडलेले आहे. पर्यावरण संरक्षण, इंधन आयात कमी करणे आणि स्वस्त वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी हाच मार्ग देशाला पुढे नेईल, असे ते म्हणाले.
नागपुरात झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी आता पर्यायी इंधन स्वीकारणे अपरिहार्य असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, ट्रॅक्टर कंपन्यांनी आता फ्लेक्स इंजिन तंत्रज्ञानावर काम सुरू केले असून, १०० टक्के इथेनॉल आणि सीएनजीवर चालणारे फ्लेक्स इंजिन ट्रॅक्टर तयार झाले आहेत. अलीकडेच तीन नवीन ट्रक लॉन्च करण्यात आले आहेत. यापैकी दोन ट्रक डिझेल/पेट्रोल इंजिनसोबत हायड्रोजन मिश्रण वापरतात. तर एक ट्रक पूर्णपणे हायड्रोजन फ्यूल सेलवर चालतो. याशिवाय, कन्स्ट्रक्शन आणि कृषी उपकरणांमध्येही अशाच प्रकारचे प्रयोग सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

















