कोल्हापूर : सध्या राज्यातील काही भागांमध्ये ऊस पिकाला तुरा दिसून येत आहे. तुरा आल्यानंतर उसाची वाढ थांबते, कांदीमध्ये साठवलेली साखर तुरा निर्मितीसाठी वापरली जाते. त्यामुळे उत्पादन व गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण होते. सामान्यतः उसाथी शाखीय वाढ दीर्घकाळ चालत राहून कांडीमध्ये साखरेचा साठा वाढणे अपेक्षित असते. परंतु प्रतिकूल हवामान, दिवस-रात्रीच्या कालावधीत होणारे बदल, पाणी व अवद्रव्यांचा ताग तसेच काही जातींची आनुवंशिक प्रवृत्ती यामुळे ऊस वेळेपूर्वी प्रजनन अवस्थेत प्रवेश करतो व तुरा येतो. परिणामी, रसाचे प्रमाण कमी होऊन ऊस पोकळ व हलका बनतो. त्याचा फटका शेतकऱ्यांसह साखर कारखान्याला बसतो. यासाठी योग्य लागवड कालावधी, पाणी व्यवस्थापन, खतांची योग्य मात्रा देणे गरजेचे असल्याचे मांजरी बुद्रूक- पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्रज्ञ समाधान सुरवसे, डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. अशोक कडलग यांनी सांगितले. विशेषतः ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत पाण्याचा ताण पडल्यास तुरा येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य वेळेस सिंचन करून जमीन वाफसा स्थितीमध्ये ठेवणे हे महत्वाचे आहे.
शास्रज्ञांनी सांगितले की, उसाला तुरा आल्याने होणारे नुकसान आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय आदी बाबींचावत शास्त्रीय माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा दिवस छोटा आणि रात्र मोठी होते, तेव्हा उसाच्या पानांमध्ये तुरा निर्मितीची सुरुवात करते. भारतात प्रामुख्याने सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यांमध्ये अशा प्रकारचे हवामान असल्यामुळे उसाला मोठ्या प्रमाणात तुरा येतो. तसेच उसाला तुरा येण्यासाठी २० ते ३० अंश सेल्सिअस तापमान पोषक ठरते. तर उसाच्या काही ऊस जातींमध्ये तुरा येण्याची प्रवृत्ती असते. पिकाला सतत पाणी दिल्यास व जमिनीतून पाण्याचा योग्य निचरा होत नसल्यास तुरा देण्याची शक्यता वाढते. त्यामुळे योग्य सिंचन नियोजन करणे तसेच जमिनीचा निचरा व्यवस्थित ठेवणे हे महत्वाचे ठरते. तसेच तुरा येण्याचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी उसाला शिफारशीनुसार एकात्मिक अनद्रव्ये खत व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. उसाला पाण्याचा ताण, तापमानातील अचानक बदल किंवा अचद्रव्यांचा ताण यामुळेही काही वेळा तुरा येऊ शकतो. यासाठी संतुलित खत व्यवस्थापन हवे.

















