छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना आणि नांदर येथील शिवाजी ॲग्रो लिमिटेड या कारखान्यांनी अद्याप आपला दर जाहीर केलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. दर निश्चित न करताच ऊस तोडणी आणि वाहतूक करणे, हा शेतकऱ्यांवर अन्याय असून सहकार तत्त्वांच्या विरोधात आहे. तालुक्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करून शेतकऱ्यांना थकीत ऊस बिले द्यावीत, अन्यथा दोन जानेवारीपासून आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष माउली मुळे यांच्या नेतृत्वाखाली यासंदर्भात जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
याबाबत निवेदनात म्हटले आहे की, सचिन घायाळ शुगरने २८०० रुपये ऊस दर देण्याचे लेखी पत्राद्वारे मान्य केले. मात्र, अद्याप अनेक शेतकऱ्यांची बिले जमा झालेली नाहीत. तर , असा आरोप संघटनेने केला आहे. विहामांडवा येथील रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना आणि नांदर येथील शिवाजी ॲग्रो लिमिटेड या कारखान्यांनी ऊस दरच जाहीर केलेला नाही. जिल्हा प्रशासनाने आणि कारखानदारांनी यावर तातडीने तोडगा न काढल्यास होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाला प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा संघटनेने दिला आहे.

















