कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखान्याकडे दि. १६ ते ३० नोव्हेंबर पर्यंत गाळप झालेल्या उसाची ३,६५३ रुपये प्रतिटनप्रमाणे बिले अदा केली आहेत. कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील आणि उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी ही माहिती दिली. दि. ११ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत एकूण ८६,०६६ टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. यापोटी सभासदांच्या बँक खात्यावर आतापर्यंत ३१ कोटी ४३ लाख ९९ हजार १८६ रुपये ऊस बिलापोटी अदा करण्यात आले आहेत. तर पंधरवड्यातील सभासदांच्या बँक खात्यावर २४ कोटी २० लाख ६० हजार ८०२ रुपये वर्ग करण्यात आले आहेत.
कारखान्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले की, भोगावती कारखान्याने राज्यात विक्रमी ३,६५३ रु. पहिली उचल जाहीर केली होती. ही उचल सभासदांच्या बँक खात्यावर वर्गही केली आहे. कारखान्याच्या विश्वासार्हतेवर सभासद, ऊस पुरवठादारांनी शिक्कामोर्तब केला आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. सभासदांसह तोडणी, ओढणी कर्मचारी, कर्मचारीवर्ग यांनी दाखविलेल्या विश्वासार्हतेवरच अपेक्षित गाळपाचा टप्पा पूर्ण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय पाटील- पिरळकर, कार्यकारी संचालक सागर पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते.
















