कोल्हापूर : कोवाडे (ता. आजरा) येथे वसंतराव देसाई आजरा सहकारी साखर कारखान्याकडून कोणतीही ऊस तोडणी टोळी नाही. गेली अनेक वर्षे या परिसरात ऊस तोडणीसाठी टोळी मिळत नाही. यंदाही केवळ स्थानिक ऊसतोडणी टोळी आहे. गावातील केवळ वीस टक्के उसाची तोडणी झाली आहे. कारखाना प्रशासन व पदाधिकाऱ्यांकडे ऊस तोडणीसाठी वारंवार टोळीची मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी थेट कार्यालयाला कुलूप लावले. संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित कर्मचाऱ्याला धारेवर धरले. ऊस तोडणी वेळेवर होत नसल्याबद्दल रोष व्यक्त करण्यात आला.
कोवाडे येथील शेती कार्यालयाला आज शेतकऱ्यांनी टाळे ठोकले. ऊस तोडणी वेळेवर होत नसून कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. यावेळी दिलीप यमाटे यांनी कारखाना प्रशासन कोवाडे गावाबाबत सापत्न भावाची वागणूक देत आहे. टोळ्या व वाहन चालकांची मनमानी सुरू आहे. टोळी न मिळाल्यास आंदोलन करू.’ आंदोलनानंतर कारखाना प्रशासनाने दोन दिवसांत ऊस टोळी देणार असल्याचे आश्वासन दिले. शेती अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर याबाबत खात्री पटल्यावर शेतकऱ्यांनी लावलेले टाळे काढले. यावेळी डी. वाय. देसाई, संजय शिवगंड, दीपक मेणे, कुमार बाटे, संभाजी साठे, अरुण पोवार, वसंत पताडे, वसंत जांभुटकर, दिलीप यमाटे, केरबा जगदाळे, तुकाराम जगदाळे, कृष्णा पोवार, विठ्ठल घोळसे, ईश्वर हुंदळेकर, मारुती जांभळे, धोंडीबा पोवार उपस्थित होते.

















