कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना यांनी चालू गळीत हंगामात दि. १ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत गाळप झालेल्या उसासाठी प्रतिटन ३६१४ रुपये या दराने ऊस बिलाची संपूर्ण रक्कम थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे. ही माहिती अध्यक्ष व माजी आमदार के. पी. पाटील यांनी दिली.
या दुसऱ्या पंधरवड्यात कारखान्याकडून १ लाख ३२ हजार ८४६ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याबदल्यात देय असलेली संपूर्ण ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. याशिवाय, दि. १ ते १५ नोव्हेंबर या पहिल्या पंधरवड्यातील ऊसतोडणी व वाहतूक खर्चाची बिलेही पूर्णतः अदा केल्याचे अध्यक्ष पाटील यांनी स्पष्ट केले. गळीत चालू हंगामासाठी कारखान्याने १० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले असून, सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण पिकवलेला ऊस बिद्री साखर कारखान्याकडे गाळपासाठी पाठवावा, असे आवाहनही कारखान्याचे अध्यक्ष पाटील यांनी यावेळी केले.

















