कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात ऊस रोपवाटिकेच्या व्यवसायाने शेकडो कुटुंबाना रोजगार दिला आहे. अनेक महिला व तरुणांनी रोपवाटिकेच्या व्यवसायातून आपला आर्थिक स्तर उंचावला आहे. सध्या तालुक्यातून आठ राज्यांमध्ये ऊस रोप पुरवठा केला जातो. शिरोळ तालुक्यामधून राज्यभरात आणि गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाबमध्ये उसाची रोपे पाठवले जातात. यामुळे वाहनधारकांनाही चांगले उत्पन्न मिळते. शिरोळ तालुक्याने उसाची रोपे निर्मितीमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. तालुक्यातील ५० गावांमध्ये उसाच्या रोपवाटिका आहेत. यातून सुमारे आठ हजार महिला व युवकांना तसेच १०० वाहनधारकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यामुळे रोपवाटिकेचा व्यवसाय वाढत आहे.
पूर्वी शेतकरी आपल्या स्वतःच्या शेतामध्येच उसाची रोपे तयार करत होते. रोपे तयार करण्याचे तंत्रज्ञान दिवस विकसित केल्याने बारा ते पंधरा दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीचे उसाची रोपे तयार केली जात आहेत. ऊस रोपाची लावण केल्यामुळे उसाच्या फुटव्यात वाढ होऊन वेळेची बचत तसेच एकरी उत्पन्न वाढण्यास मदत झाली. शेतकरी उसाची लावण रोपे पद्धतीने करत आहेत. सध्या या रोपवाटिकांना ऊस पुरविणाऱ्या शेतकऱ्यांनाही जादा दर मिळतो. कारखान्यापेक्षा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रोपवाटिकेला ऊस पाठवल्यास त्यांना चार हजार ते सहा हजार दोनशेपर्यंत दर मिळत आहे. २६५ उसाच्या जातीला साडेचार हजार रुपये ८६०३२ या उसाच्या जातीला चार हजार रुपये, १५००६ या उसाच्या जातीला ६२०० दर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहे. तालुक्यामध्ये ऊस रोपवाटिका हा लघुउद्योग म्हणून उदयास आला आहे. रोपवाटिकांमध्ये काम करणाऱ्या महिलांना ३५० रुपयांहून पुढे रोजंदारी मिळते. रोपवाटिकेचा व्यवसाय हवामानावर अवलंबून आहे. यामध्ये गुणवत्ता व दर्जेदार ऊस घेऊन रोपे तयार केल्यास शेतकऱ्यांमध्ये विश्वासार्हता निर्माण होते असे अर्जुन गायकवाड यांनी सांगितले.

















