सांगली : माणगंगा सहकारी साखर कारखान्यात चोरट्यांनी सुरक्षा रक्षकावर हल्ला करत सुमारे १२ लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरण्याचा प्रयत्न केला. २८ डिसेंबर रोजी मध्यरात्री १.३० वाजता हा प्रकार घडला. आटपाडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका चोरट्यास घटनास्थळीच ताब्यात घेतले. शोधमोहीम राबवून २९ डिसेंबर रोजी दुपारी उर्वरित तिघांना अटक करण्यात आली. कारखान्याचे सुरक्षारक्षक अण्णासाहेब महादेव जाधव (वय ५३) यांनी याबाबत आटपाडी पोलिस स्थानकात फिर्याद दिली.
पोलिसांनी याप्रकरणी संशयित दत्तात्रय शिवाजी गोडसे (२४), करण रघुनाथ ढेंबरे (१८, दोघेही रा. नरळेवाडी, सांगोला, जि. सोलापूर), सचिन सहजीवन चव्हाण (२१), कमरान इस्माईल ठाकूर (१९, रा. अजगणी, ता. खेड, जि. रत्नागिरी) या संशयितांना अटक केली. चोरट्यांनी कारखान्यातील वेगवेगळ्या विभागातील विद्युत मोटारी उखडून एका ठिकाणी एकत्रित केल्या. त्या दोन वाहनांमध्ये भरून नेण्यात येत होत्या. सुरक्षा रक्षकाने रोखण्याचा प्रयत्न केल्यावर चोरट्यांनी त्याच्यावर हल्ला केला. आटपाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई केली.

















