पुणे : देशात सद्य:स्थितीत एकूण ४९९ साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. यंदाच्या हंगामात अपेक्षित अंदाजानुसार अंतिम निव्वळ साखर उत्पादन ३१५ लाख टनाइतके हाती येण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत १३४० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झालेले आहे, तर ८.८४ टक्के सरासरी साखर उताऱ्यानुसार ३१ डिसेंबरअखेर सुमारे ११८ लाख ३० हजार मेट्रिक टन साखर उत्पादन हाती आले आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने यंदाच्या हंगाम अखेरीस सर्वाधिक ११० लाख मे. टन साखर उत्पादनासह महाराष्ट्रच नंबर वनवर कायम राहील असा प्राथमिक अंदाज आहे. तर १०५ लाख टन उत्पादनासह उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानावर राहण्याचे अनुमान आहे.
यंदा देशात ३ लाख मे. टन साखर इथेनॉलकडे वळवली जाईल, अशी अपेक्षा आहे. कर्नाटकमध्ये ५५ लाख टन, गुजरातमध्ये ८ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. सद्यस्थितीत भारतीय साखर अफगाणिस्तान, श्रीलंका, मध्य पूर्व देश आणि आफ्रिकन देशांमध्ये निर्यात होत आहे. राष्ट्रीय सहकारी साखर साखर महासंघाने आणखी १५ लाख टन साखर निर्यातीस परवानगी देण्याची मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. त्यापैकी किमान पाच लाख टन अतिरिक्त साखर निर्यातीस परवानगी दिल्यास साखर दरात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. याबाबत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांच्या म्हणण्यानुसार, केंद्राने १५ लाख मेट्रिक टन साखर निर्यातीस परवानगी दिलेली आहे. या पैकी आतापर्यंत सुमारे २ लाख २० हजार मेट्रिक टन साखरेच्या निर्यातीचे करार झाले आहेत.

















