नांदेड : नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत येणाऱ्या नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतून गाळप हंगाम २०२५-२६ साठी ३० कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यातील आजपर्यंत २९ कारखान्यांना गाळप परवाना मिळाला आहे. यातील २९ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. या कारखान्यांनी रविवारअखेर ५२,११,१६५ टन उसाचे गाळप केले आहे. त्यापासून ४४,२१,२९३ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सध्या विभागात १९ खासगी तर १० सहकारी साखर कारखाने ऊस गाळप करीत आहेत. सध्या साखरेचा सरासरी उतारा ८.५२ टक्के आहे. विभागात यंदा लातूर जिल्ह्यातील ट्वेंटीवन शुगर लि. माळवटी (जि. लातूर) या कारखान्याने तीन लाख ६० हजार ५१४ टन उसाचे गाळप करुन आघाडी घेतली आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर अँड एनर्जी लि. माखणी या खासगी कारखान्याने आजपर्यंत तीन लाख ६० हजार ३२० टन उसाचे गाळप करून आघाडी घेतली आहे. तर त्यापाठोपाठ तर ट्वेन्टीवन शुगर सायखेडा (ता. सोनपेट) कारखान्याने तीन लाख ६ हजार ५३० टन उसाचे गाळप केले आहे.
















