सांगली : सांगली जिल्हा बँकेने कडेगाव येथील केन ॲग्रो एनर्जी (इंडिया) लि. रायगाव या कंपनीच्या साखर कारखान्याला कर्ज पुरवठा केला होता. या कारखान्याकडे मार्च २०२२ अखेर व्याजासह २२५.५५ कोटींची थकबाकी होती. याप्रकरणी राष्ट्रीय कंपनी लवादाने कारखाना व जिल्हा बँकेच्या सहमतीनंतर कर्ज वसुलीचा अॅक्शन प्लॅन मंजूर केला. त्यानुसार, केन ॲग्रो साखर कारखान्याने जिल्हा बँकेच्या थकीत कर्जापैकी १८ कोटी ८३ लाख रुपये पहिला हप्ता भरला आहे. आता कारखान्याकडून पुढचा हप्ता मार्च २६ मध्ये भरला जाणार आहे.
कंपनीचे संस्थापक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांची भेट घेत, कंपनी लवादाने दिलेल्या निर्णयानुसार थकीत कर्ज फेडणार असल्याची ग्वाही दिली होती. कारखान्याने बँकेचे कर्ज व्याजासह पुढील सात वर्षात फेडायचे आहे. कर्जाचा पहिला हप्ता मार्च २०२५ मध्ये भरणे अपेक्षित होते. मात्र कंपनीकडून वेळेत भरणा झाला नाही. परिणामी बँकेने यावर व्याजाची आकारणी सुरू केली. त्यानुसार कंपनीने दोन टप्प्यात पहिल्या हप्त्याचे १८.८३ कोटी रुपये जिल्हा बँकेत भरले आहेत. गेल्या काही वर्षापासून थकीत केन अॅग्रोच्या कर्जाची वसुली सुरू झाली असून जिल्हा बँकेला हा दिलासा आहे. बँकेने केन अॅग्रोकडून विलंब झालेल्या दिवसांवरही व्याज आकारणी केल्याचे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.

















