लातूर : येथील श्री निळकंठेश्वर सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ या गळीत हंगामात एका दिवसात ३१०४.७७८ मेट्रिक टन ऊस गाळप करून आपला सर्वाधिक एकदिवसीय गाळपाचा विक्रम प्रस्थापित केला आहे. यावर्षीच्या गळीत हंगामासाठी कारखान्याने तीन ते साडेतीन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हंगाम सुरू झाल्यापासून आतापर्यंत कारखान्याने ९० हजार मेट्रिक टन ऊस गाळप केला आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या दूरदृष्टी पूर्ण नेतृत्वामुळे पुन्हा सहकार क्षेत्रात सक्षमपणे उभा राहिला असून हे उत्कृष्ट नियोजन, सक्षम व्यवस्थापन, आधुनिक यंत्रसामग्री, शेतकरी- केंद्रित धोरणांचे फलित ठरले आहे. किल्लारी साखर कारखान्याच्या या यशामुळे परिसरातील शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.
किल्लारी साखर कारखान्याने प्रस्थापित केलेला हा ऐतिहासिक उच्चांक सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचा परिणाम असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले. ते म्हणाले की, बंद पडलेला कारखाना पुन्हा सुरू करताना अनेक अडचणी आल्या. मात्र केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने तसेच शेतकरी, कामगार, अधिकारी व सहकारी संस्थांच्या विश्वासामुळे हे शक्य झाले. आधुनिक यंत्रसामग्री, तांत्रिक दक्षता, वेळेवर देखभाल व दुरुस्ती तसेच प्रभावी वाहतूक व्यवस्थेमुळे गाळप प्रक्रियेला लक्षणीय वेग प्राप्त झाला आहे. या यशामध्ये शेतकऱ्यांच्या उसाची वेळेवर तोडणी, शेतकऱ्यांकडून दर्जेदार ऊस पुरवठा, वाहतूकदारांची शिस्तबद्ध कामगिरी, अधिकारी व कर्मचाऱ्यांची मेहनत याचा समावेश आहे.

















