नवी दिल्ली : देशातील साखर उद्योगाने चालू गळीत हंगामात गेल्यावर्षीच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक ही ऊस उत्पादन घेणारी तीन प्रमुख राज्ये आहेत. या तीन राज्यांमध्ये महाराष्ट्राची कामगिरी अव्वल राहिली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ (एनएफसीएसएफ) ने दिलेल्या माहितीनुसार, देशातील साखर उत्पादन ११८.३० लाख टनांवर पोहोचले आहे. ३१ डिसेंबरअखेर ४९९ कारखान्यांनी हंगाम सुरु केला आहे. त्यांनी आतापर्यंत १,३३९.२१ लाख मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत १,१०१.८७ लाख मेट्रिक टन ऊस गाळप केले होते. यंदा गाळपाचे प्रमाण अधिक आहे. गेल्या हंगामात समान कालावधीत साखर उत्पादन ९५.६० लाख टन होते.
‘एनएफसीएसएफ’च्या आकडेवारीनुसार, ३१ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील ५५६.५७ लाख मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. सध्या महाराष्ट्रातील साखर उतारा ८.७५ टक्के एवढा आहे. गेल्या हंगामात उतारा ८.६ टक्के होता. उत्तर प्रदेशने साखर उताऱ्यात महाराष्ट्राला मागे टाकले आहे. उत्तर प्रदेशात ३१ डिसेंबरपर्यंत गाळप केलेल्या उसाचा सरासरी साखर उतारा ९.७ टक्के एवढा आहे. या राज्यात ११९ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु केला आहे. त्यांनी आतापर्यंत ३६७.५३ लाख मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. कर्नाटकातील ७५ कारखान्यांनी २७९.७५ लाख मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. साखर उतारा ७.९ टक्के आहे. साखर उत्पादन गेल्या हंगामातील २०.५५ लाख मेट्रिक टनांच्या तुलनेत २२.१ लाख मेट्रिक टनापर्यंत वाढले आहे.

















