सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्व कारखानदारांनी उसाला पहिली उचल ३,००० रुपये जाहीर केली. मात्र, वाकी (शिवणे) येथे असलेला धाराशिव साखर कारखाना युनिट क्रमांक चार मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर उसाचा पहिला हप्ता म्हणून २,८०० रुपये खात्यावर जमा केले आहेत. शेतकऱ्यांवरील या अन्यायाविरोधात युवा सेनेतर्फे सोमवारी (ता. ५) कारखानास्थळी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शिवसेना (उबाठा) युवा सेनेचे तालुका युवा अधिकारी सुभाष भोसले यांच्यासह याबाबत एक शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे.
याबाबत शेतकऱ्यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिला हप्ता ३,००० रुपये देत आहेत. मात्र वाकी-शिवणे (ता. सांगोला) येथील धाराशिव साखर कारखाना युनिट ४ शेतकऱ्यांना पहिला हप्ता कमी देत आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने पहिला हप्ता तीन हजार रुपये जाहीर केला आहे. सांगोला तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांवर हा अन्याय केला जात आहे. यामुळे धाराशिव कारखाना युनिट क्रमांक चारने ३,००० रुपये पहिली उचल द्यावी. अन्यथा सोमवारपासून उपोषणाचा इशारा सुभाष भोसले, शंकर मेटकरी, नवल गाडी, सचिन सुरवसे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.
















