धाराशिव : नॅचरल शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि. रांजणी या कारखान्याचे कार्यक्षेत्रामध्ये ‘कृत्रिम बुध्दिमत्ता’ ऊस उत्पादन वाढीचा प्रकल्प शुभारंभ सकाळ माध्यम समुहाचे अध्यक्ष व ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे (बारामती) विश्वस्त प्रतापराव पवार यांच्या शुभहस्ते, नॅचरल उद्योग समुहाचे अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि किर्ती किरण पुजार, जिल्हाधिकारी, धाराशिव, डॉ. अशोकजी कडलग, प्रमुख शास्त्रज्ञ आणि विभाग प्रमुख पीक उत्पादन व संरक्षण विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट तसेच तुषार जाधव, शास्त्रज्ञ केव्हीके, बारामती यांच्या प्रमुख उपस्थितीत 4 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाला.
प्रतापराव पवार म्हणाले, शेतीसाठी खर्च कमी आणि उत्पादन जास्त या प्रकारची शेतीच यापुढे शेतक-यांना वाचवू शकते. एआय तंत्रज्ञान हे शेतक-यांसाठी एक वरदान आहे. ऊस पिक उत्पादन वाढीसाठी जास्तीत जास्त शेतक-यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून आपली शेती आर्थिक फायदयाची करून घ्यावी. एआय तंत्रज्ञानामुळे शेतीसाठी कसा फायदा आहे? याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘नॅचरल शुगर’ने महाराष्ट्रात सर्वप्रथम सर्वात जास्त सभासद शेतक-यांचे शेतात एआय तंत्रज्ञानाचा वापर केला असून तो शेतक-यांसाठी एक क्रांतिकारक बदल राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले
याप्रसंगी राजेंद्र पवार म्हणाले, शेतकरी शेतीच्या आधुनिकतेला दुर्लक्षीत करत आहेत. आज एआय तंत्रज्ञानाचे महत्व शेतक-यांना समजावून देण्याची आवश्यकता आहे, मात्र येत्या 10 वर्षात सर्वच शेतकरी एआय तंत्रज्ञानाला व ते महाराष्ट्रात प्रथम घेवून येणा-या प्रतापराव पवार यांना डोक्यावर घेतील. आज प्रगतशिल देशामध्ये जास्तीत जास्त लोकांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी एआयचे महत्व सांगितले व नॅचरल उद्योगाने एआय तंत्रज्ञानाची केलेली सुरूवात ही कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले. यापुढे नॅचरल उद्योगोसमवेत जिल्हयात ऊस उत्पादनासोबतच इतर पिकांसाठी देखील एआय तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त कसा होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी कृषिरत्न ठोंबरे म्हणाले, शेतकऱ्यांचे ऊस उत्पादन वाढविणेसाठी ॲग्रीकल्चर ट्रस्ट बारामती, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएश्न पुणे यांचे सयुक्त विद्यमाने ऊस पिकासाठी कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञान (एआय) चा वापर करण्यासाठी आम्ही एकूण 753 शेतक-यांची नोंद केली असून त्यांचे शेतामध्ये हवामान केंद्र उभारणीचे कामासाठी प्रत्यक्ष सुरूवात झालेली आहे. आज या एआय ऊस उत्पादन वाढीचा प्रकल्प शुभारंभ झालेला आहे. या एआय तंत्रज्ञानामुळे जमिनीतील आद्रता, पिकाला पाण्याची गरज, हवामानाचा अंदाज, पिकाला खताची गरज व कीड व्यवस्थापन इत्यादिची माहिती मराठी भाषेमध्ये आपल्या मोबाईलवर मिळणार आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतक-याचे ऊस पिक उत्पादन नक्कीच दुप्पट होणार आहे. मात्र शेतक-यांनी दररोज शेतात जाऊन मोबाईलवर आलेल्या सल्ल्यानुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे. नॅचरल शुगर हा राज्यात सर्वात जास्त एआयचा वापर करणारा कारखाना ठरला असल्याचेही ते म्हणाले.
सुत्रसंचालन कारखान्याचे संचालक कृषिभूषण पांडूरंग आवाड यांनी केले. कार्यक्रमास कारखान्याचे धाराशिव, लातूर बीड, परभणी व जालना जिल्हयातील कारखान्याचे चेअरमन, कार्यकारी संचालक, सरव्यवस्थापक व प्रतिनिधी तसेच कारखान्याचे संचालक, प्रवर्तक, शेतकरी सभासद, कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

















