सांगली : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचा राजारामबापू इंडोमेंट ट्रस्ट कारखान्याचे सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने सातत्याने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हातभार लावणारे अनेक उपक्रम राबविले आहेत. प्रतिक पाटील यांनी ट्रस्टच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या विकासकामांना गती दिली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीवरून तब्बल ७८ गावातील ९१ पाणंद रस्त्यांचे मुरमीकरण केले आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा लाभ झाला आहे. याशिवाय, कारखान्याने कार्यक्षेत्रात १३०० बोअरची खुदाई करून त्यावर हातपंप बसविण्याचा विक्रम केला आहे. एखाद्या साखर कारखान्याने इतक्या मोठ्या प्रमाणात बोअर खुदाई केलेले हे दुर्मिळ उदाहरण आहे.
राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी पुढाकार घेऊन या कामांना गती दिल्याने कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. इंडोमेंट ट्रस्टच्या माध्यमातून कारखाना कार्यक्षेत्राच्या शिवारातील पाणंद रस्त्यांचे मुरुमीकरण, जेसीबीने नाले खुदाई, वाडी-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी नव्या बोअरची खुदाई, व्यायाम शाळांची दुरुस्ती आणि साहित्य पुरवठा आदी पावणे दोन कोटींची विकासकामे केली आहेत. कारखान्याने, कार्यक्षेत्रातील नाल्यांची जेसीबीने साफसफाई केली आहे. खरे तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे हे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद किंवा सरकारचे काम. मात्र कारखान्याने याकडे लक्ष दिले आहे. कारखान्याने कार्यक्षेत्रातील अनेक गावांत व्यायामशाळा दुरुस्त केल्या असून नवीन साहित्य दिले आहे. विविध विकासकामांचे आणि योजनाचे शेतकरी व सभासदांकडून जोरदार स्वागत केले जात आहे.

















