कोल्हापूर : खोडवा उसामध्ये आंतरपीक घेण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिला आहे. खोडवा उसातली ७० टक्क्यांपर्यंत जागा ही सुरुवातीला रिकामीच राहते. पण आंतरपिकामुळे ही रिकामी जागा आपल्याला उपयोगात आणता येते. एवढेच नाहीतर आंतर पिकांमुळे जमिनीची उत्पादकता वाढते आणि शेतकऱ्यांना जास्तीचं उत्पन्नही मिळते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खोडव्याची उगवण पूर्ण व्हायला साधारणतः तीन ते चार महिने लागतात. या कालावधीत ७० ते ९० दिवसांची पिके आपल्याला घेता येतात. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो असे तज्ज्ञांनी सांगितले.
कृषीतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या आंतरपिकांमध्ये भाजीपाला, कडधान्य, तेलबिया यांचा समावेश करता येतो. आंतरपिके घेतल्यास तणांचे नियंत्रण करता येते. जमिनीत सेंद्रीय घटकांची चांगली वाढ होते. नत्राचे संवर्धन होते. भाजीपाला, तेबलिया, कंदवर्गीय पिके यामध्ये कांदा, भेंडी, चवळी, गवार, राजमा, घेवडा दोन ते तीन प्रकारचा भाजीपाला, कोथिंबिर, भुईमुग, सूर्यफूल यांचे चांगले उत्पादन येऊ शकते. याशिवाय, गारज, मुळा, लाल बीट हे सुद्धा आपल्याला घेता येतात. वेलवर्गीय पिके घेताना मात्र, शेतकऱ्यांनी त्याचा उसाच्या वाढीवर परीणाम होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. या काळात खते व आंतरमशागत या दोन गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

















