धाराशिव : गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले असतानाच जिल्ह्यात ३१ लाख ५६ हजार ५३५ टन उसाचे गाळप झाले आहे. एक जानेवारीअखेर जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांनी हे गाळप केले असून त्यातून २१ लाख १९ हजार १६५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत ऊस गाळप आणि साखर उत्पादनात यंदा अडीचपट वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी पूर्ण गाळप हंगामात २७ लाख टनांवर उसाचे गाळप झाले होते. हा टप्पा यंदा पहिल्या दोन महिन्यांत पार झाला असून, विक्रमी ऊस गाळपाकडे जिल्ह्याची वाटचाल वेगाने सुरू आहे. पावसाची दमदार हजेरी, बहुतांश कारखान्यांनी ऊसतोड मजुरांवरील अवलंबित्व कमी करून हार्वेस्टरद्वारे ऊस काढणीस दिलेले प्राधान्य आदींमुळे ऊस गाळप गतीने सुरू आहे. कारखान्यांनी यांत्रिकीकरणाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे ऊसतोडणी टोळ्यांचे प्रमाण कमी होऊन त्यांची जागा हार्वेस्टरने घेतली. जिल्ह्यात यंदा १२५ च्या वर हार्वेस्टर ऊस तोडणी करीत आहेत.
जिल्ह्यात सध्या पाच सहकारी आणि आठ खासगी कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू आहे. जिल्ह्याची दैनंदिन एकूण ऊस गाळप क्षमता ५४ हजार टन आहे. पैकी पाच सहकारी कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता २२ हजार २५० टन इतकी आहे. या कारखान्यांनी १०,९७,८०० टन उसाचे गाळप करीत ७,२६,३१० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. या कारखान्यांचा साखर उतारा ६.६२ टक्के आला आहे. आठ खासगी कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता ३१,७५० टन आहे. या कारखान्यांनी २०,५८,७३५ टन उसाचे गाळप करून १३,९२,८५५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. साखरेचा सरासरी उतारा ६.७७ टक्के आला आहे. गेल्या वर्षातील गळीत हंगामाकडे दृष्टिक्षेप टाकला असता असे दिसून येते की, मागील वर्षी जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यांनी सुमारे २७,१२,५९४ टन उसाचे गाळप केले होते. त्यातून १८,१८,००० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. हा टप्पा यंदा पहिल्या दोन महिन्यांतच ओलांडला आहे.

















