सोलापूर : टेंभुर्णी येथे सोलापूर जिल्हा बनाना असोसिएशनच्या वतीने आयोजित चर्चासत्रात शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी केळी पिकाला ऊर्जितावस्था यावी, म्हणून शेतकऱ्यांसाठी फोरम आणि दबाव गट तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी शुगर लॉबीच्या कथित षड्यंत्राविरुद्ध एकजूट होण्याचा निर्धार व्यक्त केला. केळी पिकामुळेच या भागातील शेतकऱ्यांना सुबत्ता आली आहे. हे पीक देशाला सर्वाधिक परकीय चलन मिळवून देणारे आहे. मात्र, शुगर लॉबी केळी लागवडीला अडथळे निर्माण करीत आहे. याविरुद्ध सर्वानी एकत्र येऊन शासनाकडे न्याय मागावा, असा निर्णय शिवसेना माढा तालुका संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी जाहीर केला.
यावेळी शेतकऱ्यांसाठी फोरम आणि दबाव गट तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. केळीला किमान १३ रुपये किलो दर मिळावा यासाठी दक्षता घेतली जाईल असे सांगण्यात आले. कोकाटे यांनी साखर कारखानदारीच्या पिळवणुकीतून मुक्त होण्यासाठी केळी हे वरदान ठरले आहे. मात्र, ऊस क्षेत्र कमी होत असल्याने शुगर लॉबी टिश्यू कल्चर रोपे, कोल्ड स्टोअरेज अनुदान यांना अडथळे आणत आहे. याबाबत केंद्रीय कृषिमंत्र्यांना भेटून निवेदन सादर करू. शेतकऱ्यांनी संघटित झाल्यासच सरकार लक्ष देईल, असे कोकाटे यांनी स्पष्ट केले. अजिनाथ कारखान्याचे संचालक दादासाहेब पाटील, किरण चव्हाण, प्रहार संघटनेचे रमेश पाटील, सोमनाथ कदम, योगेश शेळके, विष्णू पोळ यांची भाषणे झाली. जिल्हा युवकचे अध्यक्ष सूरज देशमुख, जिल्हा बनाना असोसिएनचे अध्यक्ष संतोष पाटील, उपाध्यक्ष रघुनाथ गायकवाड, विनोद पाटील, सचिव पंकज जाधव, यशवंत भोसले, तात्या गोडगे, बाबू जहागीरदार, विलास पाटील, संतोष कदम आदी उपस्थित होते.













