कर्नाटक : मरकुंबीतील कारखान्यात स्फोट; तिघांचा मृत्यू, पाच कामगार गंभीर जखमी

बेळगाव : मरकुंबी (ता. रामदुर्ग) येथील इनामदार साखर कारखान्यात भीषण स्फोट झाला. ज्यूस बॉयलिंग हाऊसमध्ये उकळत्या रसामुळे अचानक स्फोट झाल्याने आठ कामगार गंभीररीत्या भाजले गेले. उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला असून, पाच कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे. अक्षय सुभाष चोपडे (वय ४८, रा. चावडी गल्ली, रबकवी, ता. रबकवी-बनहट्टी), सुदर्शन महादेव बनोशी (२५, रा. चिक्कमुनवळी, ता. खानापूर) व दीपक नागप्पा मुनवळी (३२, रा. नेसरगी, ता. बैलहोंगल) अशी मृतांची नावे आहेत.

स्फोटातील जखमी कामगारांना तातडीने बैलहोंगल शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना चोपडे यांचा मृत्यू झाला. उर्वरित जखमींना केएलई रुग्णालय, बेळगाव येथे हलवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान बनोशी आणि मुनवळी यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्यांमध्ये मंजुनाथ गोपाळ तेरदाळ (३१, रा. हुलिकट्टी, ता. अथणी), राघवेंद्र मल्लाप्पा गिरीयाळ (३६, रा. होसूर, ता. गोकाक), गुरुपादप्पा बिरप्पा तम्मण्णवर (३८, रा. मरेगुड्डी, ता. जमखंडी), भरतेश बसप्पा सारवाडी (२७, रा. गोडचिनमल्की, ता. गोकाक) आणि मंजुनाथ मडिवाळप्पा काजगार (२८, रा. अरवळ्ळी, ता. बैलहोंगल) यांचा समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षकांनी केएलई रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. मुरगोड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघाताचे नेमके कारण, सुरक्षेतील त्रुटी व कारखान्यातील यंत्रसामग्रीची स्थिती याबाबत मुरगोड पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जिल्हा पोलिसप्रमुख के. रामराजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here