सोलापूर : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. हंगामाच्या सुरुवातीला शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर अनेक कारखान्यांनी पहिली उचल ३००० रुपयांपर्यंत जाहीर केली होती. मात्र, प्रत्यक्षात बहुतांश कारखान्यांनी केवळ बेसिक रिकव्हरीनुसार निघणाऱ्या एफआरपीप्रमाणेच बिले दिली आहेत. प्रचलित कायद्यानुसार १४ दिवसांत पेमेंट देणे बंधनकारक असताना कारखानदारांकडून होणारी टाळाटाळ शेतकऱ्यांच्या संतापाचे कारण ठरत आहे. २१ साखर कारखान्यांनी चालू गाळप हंगामातील डिसेंबरअखेरपर्यंतची सुमारे ३९० कोटी रुपयांची ऊस बिले थकवली आहेत. सिद्धेश्वर कारखाना, लोकमंगल, भंडारकवठे, युटोपियन, सिद्धनाथ, लोकनेते, आणि सीताराम महाराज या कारखान्यांकडे थकबाकी आहे.
याबाबत ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रा. सुहास पाटील यांनी या प्रकरणी साखर आयुक्तांची भेट घेतली आहे. याची दखल घेत साखर आयुक्तांनी थकित रक्कम १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांना देण्याचे लेखी आदेश साखर सह संचालकांमार्फत कारखान्यांना दिले आहेत. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे म्हणाले की, काही कारखाने ऊसबिलाची खोटी आकडेवारी प्रशासनाला सादर करत असून कारखानदारांची मनमानी सुरू आहे. प्रशासनाचा वचक राहिला नसल्याने आता आम्ही थेट अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करून त्यांना कारवाई करण्यास भाग पाडू. दरम्यान, प्रशासनाला सादर केली जाणारी आकडेवारी आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारी रक्कम यात मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे.

















