धाराशिव : जिल्ह्यात ऊस उत्पन्नवाढीसाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे वापर सुरु झाला आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना यासाठी प्रोत्साहित जात आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी याअनुषंगाने मंगळवारी अधिकारी, कारखानदारांची बैठक घेतली. जिल्ह्यात यंदा मुबलक पावसामुळे उसाचे क्षेत्र ५५ हजार हेक्टरवर पोहोचले आहे. यातून शेतकऱ्यांना जास्त उत्पादन घेता यावे, यासाठी पहिल्या टप्प्यात किमान २० टक्के म्हणजेच ११ हजार हेक्टरवरील ऊस ‘एआय’च्या देखरेखीखाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एआय तंत्रज्ञान वापरास इच्छुक शेतकऱ्यांशी याबाबत करार करण्याची सूचना कारखानदारांना आणि कृषी विभागास करण्यात आली आहे. २० जानेवारीपर्यंत करारनामे गोळा करून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व कारखान्यांची आर्थिक मदत या उपक्रमास मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल.
जिल्हा स्तरावर एकत्रित प्रयत्नातून शेतकऱ्यांना कमी खर्चात एआय तंत्रज्ञान उपलब्ध होईल असे नियोजन केले जात आहे. या अंतर्गत किमान २५ ते ४० शेतकऱ्यांचा क्लस्टर तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक कारखान्याने किमान १० क्लस्टर, २५० शेतकरी तयार करून २० टक्के क्षेत्र एआय तंत्रज्ञानाखाली आणण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे, जिल्हा उपनिबंधक पांडुरंग साठे, १६ कारखान्यांचे संचालक उपस्थित होते. एआय तंत्रज्ञानासाठी हेक्टरी २५ हजार रुपये खर्च आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ९ हजार २५० रुपयांची मदत करणार आहे. तर, कारखान्यांकडून ६ हजार ७५० रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांना उर्वरित ९ हजार रुपये भरावे लागतील. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पुजार यांनी केले आहे. सध्या दीड हजार शेतकरी एआय तंत्रज्ञानाचा लाभ घेत असल्याचे सांगण्यात आले.

















