सोलापूर : धाराशिव कारखान्यासमोर ऊस दरासाठी उपोषणात सहभागी आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावली

सांगोला : वाकी-शिवणे येथील धाराशिव साखर कारखाना युनिट क्रमांक चारने शेतकऱ्यांच्या उसाला एकरकमी पहिला हप्ता ३,००० रुपये दर द्यावा, या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणाला १२ ग्रामपंचायतींसह दोन विकास संस्था, आरपीआय (आठवले गट), विविध संघटना, शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शविला असून, उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी सकाळी नऊ वाजता सांगोला-महूद रोडवरील कारखान्यासमोर ‘रास्ता रोको’ करण्यात येणार आहे. दरम्यान, उपोषणात सहभागी आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. त्याची दखल घेत तहसीलदार बाळूताई भागवत, निवासी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे यांनी उपोषणकर्त्याची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.

शिवसेना उद्धव ठाकरे गट युवासेना तालुकाप्रमुख सुभाष भोसलेंसह चौघाजणांनी कारखाना कार्यस्थळावर आपले उपोषण सुरू ठेवले आहेत. बुधवारी, तिसऱ्या दिवशीच्या आंदोलनात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली. यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता दिसून येत आहे. दरम्यान, तहसीलदार भागवत यांनी धाराशिव साखर कारखान्याच्या कार्यालयात जाऊन इतर कारखान्यांनी किती दर दिला याची माहिती घेतली. इतर कारखान्यांनी पहिला हप्ता ३,००० रुपये दिला असेल तर धाराशिव युनिट ४ मध्येही पहिला हप्ता तेवढाच देण्यात काय अडचण आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनीही उपोषणकर्त्यांची भेट घेऊन संवाद साधला. यावर लवकर तोडगा काढण्यात यावा अन्यथा आंदोलन तीव्र होईल, असा इशाराही दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here