सोलापूर : दुधनी (ता. अक्कलकोट) येथील ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या युनिट क्रमांक १५ मध्ये साखरपूजन श्रीमद् काशीपीठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी, दुधनीतील विरक्त मठाचे डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामी, मैंदर्गीच्या गुरुसंस्थान हिरेमठचे नीलकंठ शिवाचार्य महास्वामी, खेडगीच्या विरक्त मठाचे शिवबसव राजेंद्र महास्वामी, नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी, ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांच्या हस्ते झाले. डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामींनी ओंकार ग्रुपचे कौतुक केले. ओंकार ग्रुपने सोलापूर जिल्ह्यात अडचणीतील साखर कारखाने पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांच्या उसाला योग्य बाजारभाव देण्याचा प्रयत्न केला. शेतकरी हितासाठी बाबूराव बोत्रे-पाटील यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे, असे ते म्हणाले.
यावेळी बाबूराव बोत्रे-पाटील म्हणाले, ओंकार ग्रुपने पूर्वीचा बंद पडलेला कारखाना सुरू केल्यानंतर जुनी थकीत देणी दिली. चालू वर्षी गाळप करताना शेतकऱ्यांना अधिकाधिक बाजारभाव देण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी जगाला तरच कारखानदारी टिकणार आहे, त्यामुळे प्रयत्न केले जात आहेत. यावेळी जनरल मॅनेजर विठ्ठल गायकवाड यांनी कार्यक्रमात स्वागत केले. अभय माने-देशमुख यांनी प्रास्ताविक केले. या वेळी शेतकरी, सभासद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















