सातारा : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने ऊस शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. चार दिवसीय शिबीरासाठी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या १२ महिला शेतकरी रवाना झाल्या असून, त्यांना अत्याधुनिक ऊसशेतीचे धडे गिरविण्याची संधी मिळणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटतर्फे शेतर्कयांना दरवर्षी ऊसशेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, ऊसाच्या प्रतिएकरी उत्पादनवाढीसाठी प्रशिक्षण दिले जाते. कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील संचालक मंडळाने कार्यक्षेत्रातील महिला शेतर्कयांना या शिबीरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
पुणे येथे आयोजित शिबीरासाठी रवाना झालेल्या महिला शेतकऱ्यांना संचालक बाबासो शिंदे, विलास भंडारे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, मनोज पाटील, जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील यांच्यासह सर्व खातेप्रमुख यांनी शुभेच्छा दिल्या. शिबीरात ऊस शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली वापर, माती परीक्षण, अधिक ऊस उत्पादनासाठी खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, खोडवा व्यवस्थापन, ऊती संवर्धित रोपे, बियाणे मळा, रोग व कीड नियंत्रण व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जैविक खतांचा वापर आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

















