अहिल्यानगर : ओंकार शुगर ग्रुपच्या गौरी शुगर कारखान्याकडून पाच लाख टन ऊस गाळप

अहिल्यानगर : श्रीगोंदा व शिरूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील हिरडगाव (ता. श्रीगोंदा) येथील ओंकार शुगर ग्रुपच्या गौरी शुगर कारखान्याने नुकतेच पाच लाख टन उसाचे गाळप केले आहे. याबाबत ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील म्हणाले की, ओंकार शुगर ग्रुपवर शिरूर व श्रीगोंदा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास, कारखान्याचे कुशल व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांचे प्रामाणिक परिश्रम यामुळे ही कामगिरी शक्य झाली. राज्यात विविध ठिकाणी अनेक वर्षांपासून बंद पडलेले १७ साखर कारखाने ओंकार ग्रुपच्या माध्यमातून पुन्हा सुरू केले आहेत.

बाजारभावाच्या बाबतीतही इतर कारखान्याच्या तुलनेत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ओंकार ग्रुपने आघाडी घेतली आहे. या कामगिरीच्या जोरावर आगामी काळात राज्यात ओंकार ग्रुप एक नंबरचा ऊस गाळप करणारा समूह ठरेल. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत ऊस उत्पादकांना योग्य दर, वेळेवर पेमेंट आणि पारदर्शक कारभार दिल्यामुळे शेतकऱ्यांचा कारखान्यावरचा विश्वास वाढत आहे. बंद पडलेल्या कारखान्यांना उभारी मिळाल्याने ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीही मिळाली आहे. त्यामुळे कारखाना परिसराचा कायापालट होत आहे.

याबाबत गौरी शुगरचे व्यवस्थापक रोहिदास यादव म्हणाले, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला ऊस वेळेत व नियोजनबद्ध पद्धतीने गाळपासाठी स्वीकारण्यात आला. ऊस वाहतूक, गाळप आणि पेमेंट या सर्व बाबींमध्ये शिस्त पाळण्यात आल्याने कारखान्यावरील शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. भविष्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गाळप वाढवणे, शेतकऱ्यांना योग्य दर देणे व परिसराच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी ओंकार ग्रुप कटिबद्ध राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here