महाराष्ट्र – आधी अहवाल द्या; नंतरच कर्ज घ्या : ‘एनसीडीसी’कडून १४ साखर कारखान्यांना नकार

मुंबई : आधी दिलेल्या कर्जाचा कथितरीत्या नीट विनियोग न केल्याने राज्यातील १४ सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार निगमने (एनसीडीसी) कर्ज देण्यास नकार दिला आहे. यापूर्वी दिलेल्या ४३५५.१२ कोटी रुपयांच्या दिलेल्या कर्जाचा विनियोग कशा पद्धतीने करण्यात आला आहे, याची राज्य सरकारने चौकशी करून अहवाल दिल्यानंतरच पुढील कर्ज वितरित करण्यात येईल, असे ‘एनसीडीसी’ने स्पष्ट केले आहे. दैनिक ’अॅग्रोवन’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या सहकारी साखर कारखान्यांना ‘एनसीडीसी’कडून कर्जपुरवठा करण्यात येतो. गेल्या दोन वर्षांमध्ये राज्यातील ३३ साखर कारखान्यांना ४३५५.१२ कोटी रुपये यांचे कर्ज दिले आहे. या कर्जाचा विनियोग ‘एनसीडीसी’ने ठरवून दिलेल्या घटकांसाठीच करावयाचा असतो. मात्र सहकारी साखर कारखान्यांनी या कर्जाचा विनियोग भलत्याच कारणांसाठी केल्याचे पाहणीमध्ये निदर्शनास आले आहे. याबाबत २१ सहकारी साखर कारखान्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, यंदाच्या गळीत हंगामासाठी आर्थिक अडचणीत असलेल्या १४ सहकारी साखर कारखान्यांचे प्रस्ताव राज्य सरकारने ‘एनसीडीसी’कडे पाठवले होते. मात्र जोवर सर्व २१ कारखान्यांची चौकशी होऊन त्यांच्यावरील कारवाई निश्चित होत नाही तोवर कुणालाच कर्ज देणार नाही, अशी भूमिका ‘एनसीडीसी’ने घेतली आहे. मंत्रिमंडळ उपसमितीने मंजुरी दिल्यानंतर ‘एनसीडीसी’ कडे १४ प्रस्ताव दाखल झाले होते. या कारखान्यांनी २६५०.५४ कोटी रुपयांची मागणी केली होती.

प्रस्ताव पाठविलेले कारखाने (आकडे कोटी रुपयांत)

श्री रामेश्वर सहकारी साखर कारखाना रावसाहेब नगर सिपोरा बाजार, भोकरदन : १०६.०८

अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, शाहूनगर, शेंद्रे, सातारा : ४१०.८९

विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना, मुरूम, उमरगा : ७२

भोगावती सहकारी साखर कारखाना, शाहूनगर, परिते, कोल्हापूर : ११४

लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना, सुंदरनगर, धारूर, बीड ३०.२१

तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना, वारणानगर, पन्हाळा १३९.६३

रावसाहेब पवार घोडगंगा सहकार साखर कारखाना, शिरूर : १८४.१२

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, कुमठे, सोलापूर

दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना, बिद्री, कोल्हापूर, २६१.८०

कर्मयोगी कुंडलिकराव रामराव पाटील कुकडी, पिंपळगाव : ४९.८५

मुळा सहकारी साखर कारखाना नेवासा, अहिल्यानगर : १८०.२०

क्रांती अग्रणी डॉ जी. डी. लाड सहकारी साखर कारखाना कुंडल, सांगली: ७२.५६

श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर इंदापूर : ३६१.४१

राजगड सहकारी साखर कारखाना, अनंतनगर, भोर : ४६७.८५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here