पुणे : शेतकऱ्यांनी पूर्व हंगामी व आडसाली ऊस लागवड करावी. दोन ओळीमध्ये ६ फुटापर्यंत तर २ रोपांमध्ये दीड ते दोन फुटांपर्यंत अंतर ठेवावे. को-२६५ जात खारवट चोपण जमिनीसाठी विकसित करण्यात आलेली आहे. इतर जमिनीसाठी को-८६०३२ या जातीचा अवलंब करावा, असे आवाहन ऊस उत्पादन तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन करताना मांजरी पुणे येथील ‘व्हीएसआय’चे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. रमेश हापसे यांनी केले. ग्रामोत्रती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे ग्लोबल कृषी महोत्सव २०२६- कृषी प्रदर्शन, पीक प्रात्यक्षिके आणि पीक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात ‘ऊस पिकातील एआय व उत्पादन तंत्रज्ञान’ या विषयावर पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. हापसे बोलत होते.
डॉ. हापसे म्हणाले, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधून जातिवंत बियाणे आणावी व स्वतःचा बेणेमळा तयार करावा. ऊस लागवडीपूर्वी माती परीक्षण करून नत्र, स्फुरद, पालाश व सक्ष्म अन्नद्रव्ये यांचा संतलित वापर करावा. जमिनीच्या जैविक सुपिकता, रासायनिक सुपिकता व भौतिक सुपिकतेकडे लक्ष द्यावे. सेंद्रिय कर्ब २ टक्क्यापर्यंत वाढणे गरजेचे आहे. शंख, शिंपलेपासून तयार केलेले वसंत ऊर्जा या औषधाची फवारणी ६०,९०, १२० दिवसांच्या अंतराने केली असता उसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व उत्पन्न वाढते. अतिवृष्टीच्या काळात ऊसावर ड्रोनद्वारे फवारणी करण्याचे आवाहन देखील डॉ. हापसे यांनी केले.
‘ऊस पिकातील एआय तंत्रज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. सुयोग खोसे म्हणाले, येणाऱ्या काळात बदलते हवामान, पाण्याचा तुटवडा, किड-रोगांचा प्रादर्भाव अशी आव्हाने शेतीपुढे उभी आहेत. याकरिता प्रिसिजन अॅग्रीकल्चरचा अंगीकार शेतकऱ्यांनी करावा. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित खत व पाणी व्यवस्थापन जी.आय.एस. मॅपिंग केल्यास पाण्याची ४० ते ६० टक्के बचत, खतांची २० ते ३० टक्के बचत, किड रोग नियंत्रणाच्या औषधांची ३० टक्के बचत होऊ शकते.
या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक घोलप, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चंद्रकांत ढगे, कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिल तात्या मेहेर, ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त प्रकाश पाटे, सहअध्यक्ष म्हणून ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित खैरे, संचालक तानाजी शेठ वारूळे, रत्नदिप भरवीरकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. प्रशांत शेटे यांनी केले. आभार डॉ. दत्तात्रय गावडे यांनी मानले.
















