पुणे : राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे शिष्टमंडळ लवकरच केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे. चालू गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच देशभरात साखरेचे दर ३,८५० रुपयांवरून ३,५५० रुपये प्रति क्विंटल इतके घसरले आहेत. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत इथेनॉलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नसताना साखरेच्या दरातील ही घसरण साखर कारखानदारीसाठी गंभीर ठरत आहे. त्यामुळे साखरेचा किमान विक्री दर ४१ रुपये करावा आणि इथेनॉलचा विक्री दर वाढवावा, अशी मागणी महासंघातर्फे केली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली. महासंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह आणि केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांना याबाबत निवेदन दिले आहे.
याबाबत हर्षवर्धन पाटील म्हणाले की, साखरेची प्रतिकिलो किमान विक्री किंमत ३१ रुपये असताना उसाचा प्रतिटन एफआरपी २,७५० रुपये होता. आता एफआरपी ३,५५० रुपयांपर्यंत वाढली आहे. ही वाढ सुमारे २६ टक्के आहे. फेब्रुवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत देशात एक्स-मिल साखरेचे दर ३८ ते ४० रुपये प्रति किलो होते. किरकोळ विक्री दर ४६ ते ४७ रुपये प्रति किलो होते. त्यामुळे साखरेचा किमान विक्री दर प्रतिकिलो ४१ रुपये करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. सद्यस्थितीत साखर व इथेनॉल या दोन प्रमुख उत्पन्न स्रोतांमधून मिळणाऱ्या अपुऱ्या महसुलामुळे साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना १४ दिवसांत ऊस बिले अदा करणे कठीण होत आहे. त्यामुळे कारखान्यांना बँकांकडून वाढीव कर्ज घ्यावे लागत असून, व्याजाच्या ओझ्याखाली दबले जात आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर उसाची बिले देता यावीत यासाठी साखरेचा किमान दर प्रतिकिलो ४१ रुपये आणि इथेनॉलचा विक्री दर वाढवावा. प्रतिटन उसाचा तोडणी व वाहतुकीसह सरासरी खर्च चार हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. साखर विक्री ३,६०० रुपये प्रति क्विंटल होत असल्याने आर्थिक ताण वाढून उसाची देयके देण्यात विलंब होत असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

















