सांगली : शिराळा तालुक्यात चार ते पाच साखर कारखान्यांची तोडणी सुरू आहे. मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना ऊस पेटवून तोडणी करण्याची वेळ आली आहे. याचबरोबर सलग सहा महिने पडलेल्या पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे असा ऊस काही शेतकऱ्यांनी पेटवून तोडला आहे. असा ऊस असल्यास काही कारखाने कपात करतात. त्यामुळे अशा ऊसावर कपात न करता बिले द्यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पेटवून गळितासाठी कारखान्याकडे पाठवलेल्या उसावर कपात न करता पूर्ण दर द्यावा, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे.
सलग पडलेल्या अतिवृष्टीमुळे उसाची वाढ अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. त्यातच करपा व तांबेरा रोगांचा प्रादुर्भाव आणि पाणथळ परिस्थितीमुळे उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. तसेच तालुक्यात पाच-सहा महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने ऊसतोडीला अडथळा निर्माण झाला आहे. याबाबत, उपवळेतील शेतकरी दिलीप पाटील यांनी सांगितले की, ऊसतोड मजूर एकरी पाच ते सात हजार रुपये मागत आहेत. एवढी रक्कम देऊनही बिबट्याच्या भीतीने ते काम करण्यास तयार नाहीत. त्यामुळे ऊस पेटवून तोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे सर्व कारखान्यांनी पेटवून तोडलेल्या ऊसावर कपात न करता शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
















