नाशिक : कादवा सहकारी साखर कारखान्यातर्फे सामाजिक उपक्रमांतर्गत संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रेस जाणाऱ्या दिंडीतील वारकरी भक्तांची मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार करण्यात येत आहेत. या सुविधेचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ‘कादवा’चे अध्यक्ष श्रीराम शेटे व संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे. या उपक्रमांत कादवा कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप तिडके व कादवा नर्सिंग कॉलेजच्या पथकाचा सहभाग आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधीचे शोधक वैकुंठवासी पाटील बाबा (जोपूळ) यांच्या भूमीत झाले. यावेळी कादवाचे कार्यकारी संचालक हेमंत माने, प्रशासकीय सल्लागार बाळासाहेब ऊगले, सचिव राहुल उगले, सरपंच माधवराव उगले उपस्थित होते. दहा जानेवारीला जोपूळ, खेडगाव, पिंपळगाव बसवंत, ओझर, म्हसरूळ, दिंडोरी येथे वारकरी भक्तांच्या विसावा व मुक्काम ठिकाणी तपासणी करण्यात आली. तर दि. ११ रोजी शिवनई, आक्राळे, ढकांबे, वरवंडी, म्हसरूळ, तिल्लोळी, गंगापूर रोड, नाशिक याठिकाणी तपासणी करण्यात आली. सोमवारी, दि. १२ जानेवारी रोजी गंगावन्हे, गिरणारे, म्हाळुंगी, माळेगाव, तुपी फाटा, हिरडी, रोहिले, त्र्यंबक पिंपरी या ठिकाणी तपासणी करण्यात आली. आता दि. १३ व १४ जानेवारी रोजी ब्रम्हमूर्ती दामोदर महाराज खेडगावकर आश्रमासमोर दिवसभर तपासणी व औषधोपचार होणार आहे.

















