कोपनहेगन: डॅनिश शिपिंग दिग्गज कंपनी मार्स्क इंधन म्हणून इथेनॉलचा वापर वाढवण्याचा विचार करत आहे. त्यामुळे त्यांचे चीनवरील अवलंबित्व कमी होऊ शकते आणि उद्योगाच्या डीकार्बोनायझेशन प्रयत्नांना चालना मिळू शकते. मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिन्सेंट क्लर्क यांच्या मुलाखतीचा हवाला देत फायनान्शियल टाईम्सने रविवारी याबाबतचे वृत्त दिले आहे.
याबाबत, क्लार्क यांनी स्पष्ट केले की ग्रीन मिथेनॉलसारख्या इंधनांच्या बाजारपेठेत चीनचे वर्चस्व असले तरी, अमेरिका आणि ब्राझील हे जगातील सर्वात मोठे इथेनॉल उत्पादक देश आहेत. एफटीशी बोलताना क्लार्क यांनी सांगितले की जर सर्व फायदे चीनला मिळाले तर काही देश त्याचा विरोध करतील. परंतु जर फायदे अधिक समानतेने वाटले गेले तर अधिक देश त्याचे समर्थन करतील. त्यामुळे ग्रीन ट्रान्झिशनचा अधिक देशांना फायदा होईल.
शिपिंग क्षेत्रासमोर सद्यस्थितीत कार्बन उत्सर्जन कमी करण्याबाबत बहुतेक क्षेत्रांपेक्षा मोठी आव्हाने आहेत. त्यासाठी विद्यमान जहाजांना महागडे रिट्रोफिट करावे लागतील किंवा ई-इंधनावर चालणारी नवीन जहाजे बांधावी लागतील. गेल्यावर्षीच्या अखेरीस, शिपिंग कंपन्या हापॅग-लॉयड आणि नॉर्थ सी कंटेनर लाइन (एनसीएल)ने CO2 उत्सर्जन कमी करण्यासाठी २०२७ पासून किमान तीन वर्षांसाठी कंटेनर जहाजांवर हायड्रोजनपासून बनवलेले कमी-उत्सर्जन इंधन वापरण्यासाठी निविदा जिंकली होती.

















