पुणे : जिल्ह्यात यंदा सहकारी व खासगी असे एकूण १४ साखर कारखाने ऊस गाळप करीत आहेत. आतापर्यंतच्या ऊस गाळपात बारामती ॲग्रो साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे. बारामती ॲग्रोने १३ लाख ९३ हजार ५२३ टन ऊस गाळप करून आघाडी घेतली असून, साखर उताऱ्यात ११.२५ टक्क्यांसह श्री सोमेश्वर साखर कारखाना प्रथम क्रमांकावर आहे. चालू ऊस गळीत हंगाम वेगात सुरू असून तो आता मध्यावर आला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १४ कारखान्यांनी ७४ लाख २९ हजार ७२० टन ऊस गाळप करून ६६ लाख ९८ हजार ६३१ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ९.०२ टक्के आहे. सध्या सुरू असलेल्या ९ सहकारी व ५ खासगी साखर कारखान्यांची एकत्रित दैनंदिन गाळप क्षमता १ लाख २६ हजार टन इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व व उत्तर भागात ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने लागवड क्षेत्र वाढले होते. त्यापैकी सुमारे दीड लाख हेक्टरवरील ऊस यंदा गाळपासाठी उपलब्ध आहे. या उसाचे गतीने गाळप सुरू आहे, अशी माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
















