कर्नाल : येथील प्रादेशिक संशोधन केंद्रातील ऊस पैदास संशोधन संस्थेने उसाचे कर्ण- १८ (को-१८०२२) हे नवीन वाण विकसित केले आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नुकतेच १८३ विविध पिकांचे वाण प्रसारित केले होते. त्यात या ऊस वाणाचा समावेश होता. कर्ण १८ हे नवीन ऊस वाण येणाऱ्या काळात देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. देशातील सर्वाधिक ऊस पीक घेतल्या जाणाऱ्या उत्तर- पश्चिम भारतातील शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी भेट असल्याचे बोलले जात आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये हे वाण लागवडीसाठी अनुकूल मानण्यात आले आहे. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल, असे ऊस पैदास संशोधन संस्थेच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी सांगितले.
कर्ण-१८ हे वाण हवामान अनुकूल असून क्षारपड आणि दुष्काळ सहनशील आहे. त्याशिवाय, ते उसामधील लाल सड रोग प्रतिरोधक आहे. तसेच त्यात टॉप बोरर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते. हे नवीन वाण सध्याच्या को-०५०११ वाणाची जागा घेईल. आणि त्याचे खोडवा पीकही चांगले येईल. या वाणाचे सरासरी उत्पादन प्रतिहेक्टरी ९८.६ टन मिळण्याचा अंदाज आहे. तर त्याचा साखर उतारा सुमारे ११ टक्के अपेक्षित आहे. यापासून प्रति हेक्टरी सुमारे १२.६ टन साखर उत्पादन मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पीक परिपक्व कालावधीहे वाण १२ महिन्यांत परिपक्व होते. त्याची वसंत ऋतूतील लागवड फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान तर तर शरद ऋतूतील लागवड सप्टेंबर आणि ऑक्टोबर दरम्यान करता येईल. फेब्रुवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यापासून साखर कारखाने आणि कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना याचे बियाणे उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
















