सांगली : भारती शुगर्सच्या विस्तारीत ५००० मे. टन गाळप क्षमता असलेल्या नवीन प्लँटचा चाचणी गळीत हंगाम प्रारंभ झाला. कारखान्याचे मार्गदर्शक महेंद्रआप्पा लाड, चेअरमन ऋषिकेश लाड, रोहन लाड, राजेंद्र लाड, सोनहिरा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. एफ. कदम, हैबतराव (काका) लाड इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हस्ते हा समारंभ झाला.
प्रास्ताविक कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. पाटील यांनी केले. नवीन प्लँटच्या सर्व तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महेंद्रआप्पा लाड म्हणाले की, सर्वांच्याच अथक परिश्रमामुळे नवीन प्लैंट गाळप करण्यास पूर्णपणे सज्ज झाला आहे. परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस गळीतास पाठवून कारखान्यास सहकार्य करावे. सर्वांचे हित हेच आमचे हित या धरतीवर भारती शुगर्स नेहमी कार्यरत राहील.
चालू गळीत हंगामात ऊसबिले वेळेत अदा केली आहेत. कारखान्यात काम करणाऱ्या कामगार कर्मचारी यांना वेतनवाढ दिली आहे. वाढीव क्षमतेमुळे परिसरातील सर्व उसाचे गाळप वेळेत पूर्ण होईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस राखून ठेवावा, असे आवाहन केले. सोनहिरा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. एफ. कदम म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीतही अनेक अडचणींवर मात करीत सर्वांच्या सामूहिक प्रयत्नामुळे नवीन प्लँटची उभारणी पूर्ण झाली आहे.

















