कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने चालू गळीत हंगामाच्या दि. १६ ते दि. ३१ डिसेंबर या पंधरवड्यातील प्रतिटनाला ३४०० रुपयांप्रमाणे ३३ कोटी, ३४ लाख ऊसबिले जमा केली आहेत. या पंधरवड्यात कारखान्याने ९९, ५३० मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. दरम्यान, दि. १ ते १५ डिसेंबर या पंधरवड्यातील तोडणी वाहतूक बिलेही अदा केल्याची माहिती अध्यक्ष, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिली.
नवीद मुश्रीफ म्हणाले, सरसेनापती घोरपडे साखर कारखान्याने चालू गाळप हंगामात आजअखेर ४,७४, ६८० मेट्रिक टन गाळप केले आहे. त्यापैकी ४,००,८३५ मेट्रिक टन उसाची बिले शेतकऱ्यांना आदा केली आहेत. सरासरी १२.१९ टक्के साखर उताऱ्याने ५,०८,५०० क्विटल इतकी साखर उत्पादित केली आहे. दरम्यान, आजचा साखर उतारा १३.४० टक्के आहे. तर को-जन प्रकल्पातून चार कोटी, दोन युनिट इतकी वीज निर्मिती करून दोन कोटी, ७३ लाख युनिट वीज महावितरण कंपनीला निर्यात केली आहे. कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाचे एकूण दोन कोटी लिटर्स स्पिरिट व इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट असून आज ८४ लाख, ५१ हजार लिटर्स स्पिरिट व इथेनॉल निर्मिती केली आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

















