सातारा : कराडच्या शेतकऱ्याची कमाल, अवघ्या २७ गुंठ्यांत घेतले ८१ टन ऊस उत्पादन

सातारा : कराड तालुक्यातील मसूर किवळ येथील प्रगतशील शेतकरी राम धरणे यांनी आपल्या २७ गुंठे क्षेत्रात उसाचे ८१ टन उत्पादन घेतले. जवळपास २ लाख ८३ हजार ५०० रुपयांचे उत्पन्न घेऊन इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श ही निर्माण केला आहे. प्रगतशील शेतकरी राम धरणे हे पूर्वी द्राक्ष शेती करत होते. परंतु नऊ वर्षापासून ते उसाशिवाय दुसरे कोणतेही पीक घेत नाहीत. धरणे स्वतः बीएससी झालेले उच्चशिक्षित असून ते मसूर येथे ऋतू अ‍ॅग्रो केमिकल फर्म चालवतात. ऊस शेती करत असताना लागण केल्यावर सुरुवातीला चार महिने शेतीकडे बारकाईने लक्ष दिले असे त्यांनी सांगितले.

शेतकरी धरणे यांनी उसाचे पीक घेण्यासाठी सुरुवातीला नांगरट केली. त्यानंतर रोटर मारून चार ट्रॉली शेणखत, १२ टन मळी विस्कटली. जप्रक्रिया करून ८६०३२ वाणाच्या उसाची कांडी लागण केली. ऊस लागण केल्याच्या दहाव्या दिवशी पहिली अळवणी आणि पुढे दहा दिवसाच्या अंतराने तीन आळवणी घातल्या. दीड महिन्यानंतर बाळ भरणी केली. तर ९० व्या दिवशी यूरिया, पोटॅश, डीएपी, निंबोळी, सिलिकॉन, ऊस स्पेशल, कॉम्बिकीट, अमोनियम सल्फेट, सेकंडरी, झाइम बकेट टाकून छोट्या ट्रॅक्टरने मोठी भर केली. सर्व क्षेत्रात ठिबकच्या साह्याने पाणी दिले. उसाचा पाला ११० दिवसानंतर काढून विरळणी केली. मे महिन्यात पावसाळी डोस दिला. अमोनियम सल्फेट, एमओपी, डीएपी असा डोस दिला. वेळच्या वेळी कामे केली तर अपेक्षित उत्पन्न मिळण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here