कोल्हापूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शासकीय वैधमापन विभागाच्या विशेष भरारी पथकाने श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वजनकाट्यांची अचानक तपासणी केली. तपासणीदरम्यान ऊस वाहून आणलेल्या वाहनांचे प्रत्यक्ष वजन घेऊन काट्यांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये कोणतीही तफावत आढळली नसून, सर्व वजनकाटे अचूक असल्याचे शासकीय पथकाने स्पष्ट केले. यावेळी शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या तपासणीत कारखान्याचे सर्व वजनकाटे शासकीय निकषांनुसार अचूक व बिनचूक असल्याचा अहवाल पथकाने दिला आहे. बिद्री साखर कारखान्याचे सर्व वजनकाटे अचूकतेचा सर्वोच्च मानदंड पाळतात. त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील साखर उद्योगात ‘बिद्री’चा वजनकाटा प्रामाणिकतेचा ‘धर्मकाटा’ म्हणून गौरविला जातो, अशी प्रतिक्रिया कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी दिली.
वैधमापनशास्त्र निरीक्षक संतोष खाडे, पुरवठा अधिकारी एस. बी. तोडसाम, पोलीस निरीक्षक प्रतिनिधी आर. आर. जाधव, निबंधक कार्यालयाचे यू. एस. रावराणे व त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांचा तपासणी पथकात समावेश होता. कारखाना कार्यस्थळावर वजनकाट्यांची सखोल पडताळणी करण्यात आली. शेतकरी प्रतिनिधी म्हणून जनार्दन गुंडू पाटील, अशोक पांडुरंग जाधव, रंगराव लहू पाटील, केनयार्ड सुपरवायझर अशोक फराकटे, अधिकारी टी. आर. बरकाळे आदींसह शेतकरी उपस्थित होते. याबाबत कार्यकारी संचालक एस. एन. घोरपडे यांनी सांगितले की, यापूर्वीही वैधमापनशास्त्र विभाग, महसूल, पोलीस खाते, प्रादेशिक साखर सहसंचालक व लेखापरीक्षक विभागाकडून वेळोवेळी कारखान्यातील वजनकाट्यांची तपासणी करण्यात आली आहे. सर्व तपासणीत कोणतीही अनियमितता आढळलेली नाही. सभासद शेतकऱ्यांचा कारखाना व्यवस्थापनावरील विश्वास कायम आहे.
















