कोल्हापूर : यंदा मे महिन्यापासून सुरू राहिलेला पाऊस ऑक्टोबरअखेर सुरू राहिला. त्यामुळे उसाची वाढ खुंटली. त्याचा परिणाम आता वजनावर दिसत आहे. यंदा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात साधारणता २ कोटी ४५ लाख टनापर्यंत गाळप होईल. गेल्यावर्षी पेक्षा १५ लाख टनाना गाळप कमी होईल असा अंदाज आहे. यंदाचा गळीत हंगाम सुरू होऊन अडीच महिने झाले आता लागण व खोडव्यांची तोड सुरू आहे. आता उसाचा सरासरी उतारा दिसत असून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात एकरी ५ ते ७ टनाचा फटका बसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील उसाचे उत्पादन कमी होणार असले तरी उर्वरित महाराष्ट्रात ते भरून निघेल, असे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या सोलापूर, मराठवाड्यात उत्पादन चांगले मिळत आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून महापूर ही कोल्हापूरच्या शेतकऱ्यांची डोकेदुखी बनली होती. महापुरात सरासरी ६५ हजार हेक्टर क्षेत्र बाधित व्हायचे. त्याचा फटका उसाच्या उत्पादनावर व्हायचा. पण, यावर्षी मे महिन्यापासून पाऊस राहिला असला तरी महापूर आलाच नाही. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना महापुराने तारले, पण सततच्या पावसाने मारले अशी स्थिती आहे. सततचा पाऊस आणि त्यातून घटलेली उसाची वाढ यामुळे विशेषता कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात वजनाला फटका बसला आहे. एरव्ही राज्यात ऊस उत्पादनात कोल्हापूर विभाग आघाडीवर असायचा. मात्र तो यंदा पिछाडीवर गेला आहे. त्या तुलनेत उर्वरित महाराष्ट्रात मात्र, उसाचे उत्पादनात फारसा फरक दिसत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
















