सोलापूर : पंढरपूर तालु्क्यातील आव्हे येथे डांबून ठेवलेल्या १० ऊसतोड मजुरांची पोलिसांनी सुटका केली. सोलापूर नियंत्रण कक्षाकडे मिळालेल्या माहितीनंतर करकंब पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या मजुरांची सुटका केली. नितीन पोपट बनसोडे व पोपट बनसोडे (दोघे रा. आव्हे, ता. पंढरपूर) यांच्या शेतात या ऊसतोड मजुरांना अटकाव करून डांबून ठेवण्यात आले होते. गेल्या २ महिन्यांपासून त्यांच्याकडून दिवसा ऊसतोड करून घेऊन रात्री या मजुरांना पत्राशेडमध्ये कुलूप लावून डांबून ठेवलेले होते. त्या १० ऊसतोड मजुरांची पोलिसांच्या मदतीने सुटका केली.
गडाप्पा शिवाप्पा सालुटगी (रा. भुयार, ता. इंडी, जि. विजापूर-कर्नाटक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करकंब पोलिसांत नितीन पोपट बनसोडे व पोपट बनसोडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रभारी अधिकारी सपोनि योगेश लंगुटे यांनी तत्काळ या घटनेबाबत माहिती घेऊन करकंब पोलिस कर्मचाऱ्यांना तेथे पाठविले. यावेळी पोलिसांनी नितीन पोपट बनसोडे व पोपट बनसोडे यांच्या घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये या ऊसतोड मजुरांची सुटका केली. करकंब पोलिस ठाण्याचे सपोनि योगेश लंगुटे, पोलिस उपनिरीक्षक नीलेश गायकवाड, तानाजी थिमधिमे, बापूसाहेब मोरे, आसिफ आतार, मेहबूब इनामदार, निखिल काळे, महेश बोंगाणे यांनी ही कामगिरी पार पाडली.

















